
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला पुन्हा मुदतवाढ दिल्याने सुधारित प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात सुमारे ११ लाख मतदारांचे पत्ते सापडले नसून दोन लाख मृत मतदारांची नोंद आढळली आहे. त्यामुळे आगामी प्रारूप मतदार यादीतून ही नावे वगळली जाण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. यापूर्वी या मोहिमेची मुदत ८ ऑगस्टपर्यंत होती. ती आता वाढवून १७ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील, तर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सध्या ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद आहे. त्यापैकी ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांचे गणना अर्ज जमा झाले असून ६२ लाख ३६ हजार ६७१ अर्जांची पडताळणी पूर्ण करून ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही सुमारे १५ लाख अर्ज बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) प्रलंबित असून त्यामध्ये मृत, दुबार आणि पत्ता न सापडलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु