
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचे नवे दर जाहीर केले असून, ते १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी, नागरिक आणि उद्योग क्षेत्राला पाणी वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
नव्या दरांबाबत हरकती आणि सूचना मागविल्यानंतर सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०२६ ते जून २०२९ या कालावधीसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी पाणी वापराचे दर ११ जानेवारी २०१८ रोजी निश्चित करण्यात आले होते.
नव्या आदेशानुसार पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी मीटरच्या आधारे पाणी वापर मोजण्यावर भर देण्यात आला असून, त्यानुसार पाणीपट्टी आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, राज्यात सिंचनासाठी अद्याप मीटर प्रणाली कार्यान्वित नसल्याने शेतीसाठी पाणीपट्टी सध्या हेक्टरी दरानेच आकारली जाणार आहे.
दरम्यान, महापालिका आणि नगरपालिकांना सुधारित दरांनुसार पाणीपट्टीची बिले देण्यासाठी आवश्यक तयारी जलसंपदा विभागाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड