
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावती–भातकुली–दर्यापूर या प्रमुख मार्गावरील पार्वती नगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक LC/3 जवळ रेल्वे विभागाने उभारलेल्या अवाजवी व निकृष्ट दर्जाच्या गतिरोधकांमुळे रोज अपघात घडत असल्याचा गंभीर आरोप भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी केला आहे. या धोकादायक गतिरोधकांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत असून प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अमरावती शहरातून भातकुली, दर्यापूर तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या हजारो नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रेल्वे क्रॉसिंगजवळ उभारण्यात आलेले उंच व अनियमित गतिरोधक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे गतिरोधक स्पष्ट दिसत नसल्याने वाहनांचा तोल जाऊन अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.याशिवाय रेल्वे गेट परिसरात आधीपासूनच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वेग कमी करताना आणि गतिरोधक ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक चारचाकी वाहनांच्या सस्पेन्शनसह इतर भागांचे नुकसान होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर
नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विद्यमान धोकादायक गतिरोधक तातडीने हटवून भारतीय रस्ते सुरक्षा नियमांनुसार नवीन व योग्य उंचीचे गतिरोधक उभारावेत, तसेच गेट परिसरातील खड्डे त्वरित बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणारी ही परिस्थिती तात्काळ बदलली पाहिजे. रेल्वे विभागाने त्वरित कारवाई करून धोकादायक गतिरोधक हटवावेत. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिलिंद बांबल यांनी दिला आहे.या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने संबंधित विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी