अमरावती: नांदगाव खंडेश्वर शहरात टँकरने पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) । पावसाळ्याच्या दिवसांतही नांदगाव खंडेश्वर शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली असताना, दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकां
नांदगाव खंडेश्वर शहरात टँकरने पाणीपुरवठा


अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) । पावसाळ्याच्या दिवसांतही नांदगाव खंडेश्वर शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली असताना, दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरासाठी विविध पाणीपुरवठा योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक परिसरात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांची टँकरकडे धाव सुरू आहे. यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'दरवर्षी पाणीप्रश्न सोडविण्याच्या घोषणा होतात, परंतु परिस्थिती मात्र बदलत नाही. पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असेल, तर कायमस्वरूपी पाणीप्रश्न नेमका कधी सुटणार?' असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांनी शहरासाठी दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची, पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्याची आणि टँकरवरील अवलंबित्व कायमचे संपविण्याची मागणी केली आहे. पाणी प्रश्नाबाबत तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास नागरिकांकडूनतीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande