
बीड, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील कडा येथील पटवा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीशी केबिनमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली डाॅ. महेंद्र पटवा याच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे कडा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती तिच्या पालकांसह कडा येथील पटवा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर डाॅक्टरने तिला तपासणीच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावले आणि तिच्याशी विनयभंग व गैरवर्तन केले.
या घटनेनंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार डाॅ. महेंद्र पटवाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांचे तपास पथक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आष्टी पोलिस सध्या घटनास्थळाचा पंचनामा करणे आणि हाॅस्पिटलमधील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर तांत्रिक पुरावे गोळा करणे आणि घटनेच्या वेळी उपस्थित कर्मचारी आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत आहेत.
विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आरोपीला चैकशीसाठी ताब्यात घेतात आणि त्यानंतर अटकेची अधिकृत नोंद केली जाते. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेतले गेल्याची अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर आलेली नाही. आष्टी पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कडा आणि आष्टी परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक संघटना आणि नागरिकांकडून आरोपी डाॅ. महेंद्र पटवा याला तातडीने अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली जात आहे.
याशिवाय अकोल्यातूनह देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील रामनगर भागातील एका खाजगी क्लिनिकमध्ये उपचाराच्या बहाण्याने 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डाॅक्टर प्रवीण अग्रवाल याला अटक केली आहे. पीडित तरुणी गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून आरोपी डाॅक्टरकडे चेहर्यावरील केस आणि त्वचेच्या उपचारासाठी येत होती.
ती नेहमीप्रमाणे क्लिनिकमध्ये गेली असताना हा प्रकार घडला. तपासणीच्या बहाण्याने डाॅक्टरने तरुणीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध लज्जास्पद स्पर्श करत, तिला मिठी मारण्याचा आणि अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच औषध देण्याच्या बहाण्याने मेडिकल स्टोअरमध्येही गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या संतापजनक घटनांमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis