अंबाजोगाईत भरदिवसा महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले
बीड, 01 सप्टेंबर (हिं.स.)। मोरेवाडी परिसरातील जिजाऊनगर पाटीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना सायंका
चोरी


बीड, 01 सप्टेंबर (हिं.स.)। मोरेवाडी परिसरातील जिजाऊनगर पाटीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारिजात कॉलनी येथील आशा भारतराव चौधरी या चनई येथे जाण्यासाठी मोरेवाडी परिसरातील जिजाऊनगर पाटीजवळ मुलाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आल्या. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण जोराने हिसका मारून तोडले आणि दोघेही दुचाकीवरून वेगाने पसार झाले.

चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा, तर मागे बसलेल्या व्यक्तीने आकाशी रंगाचा शर्ट परिधान केला होता, अशी माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. चौधरी यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही पसार होण्यात यशस्वी झाले.

हिसकावून नेलेल्या सोन्याच्या दागिन्यात गोपाची साखळी डिझाइन, दोन मंगळसूत्रे आणि चार मणी असून, त्याचे वजन २२ ग्रॅम आहे. त्याची अंदाजे किंमत १ लाख ५४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आशा भारतराव चौधरी यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश भिव्हा घुले पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande