एमपीएससी पेपरफुट प्रकरणात ऋतुजा पाटील अटकेत; संशयितांची संख्या सातवर
डिजिटल संवादातून पेपरफुटीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती नंदुरबार, 01 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ऋतुजा पाटील हिला नंद
ऋतुजा पाटीलला अटक करून नेताना पोलिस


डिजिटल संवादातून पेपरफुटीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती

नंदुरबार, 01 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ऋतुजा पाटील हिला नंदुरबार येथील तिच्या घरातून अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर तिला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले. ऋतुजा पाटीलच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या सात झाली आहे.

पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी अवघ्या 6 दिवसांत मुंबई गुन्हे शाखेचे पथक 3 वेळा नंदुरबारमध्ये दाखल झाले आहे. आतापर्यंत अटक झालेल्या सात संशयितांपैकी तीन जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अधिकारी असल्याचे तपासात समोर आले असून, उर्वरित संशयित नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.या प्रकरणाच्या तपासात ऋतुजा पाटील आणि तिचा मित्र गौरव पाटील यांच्यातील भ्रमणध्वनी संदेश महत्त्वाचा दुवा ठरल्याचे समोर आले आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत ऋतुजाने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, तर गौरव पाटील अनुत्तीर्ण झाला. दोघांमधील संबंध बिघडल्यानंतर गौरवने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परीक्षेतील कथित पेपरफुटीबाबत तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणातील त्याची भूमिका बदलल्याचेही तपासात उघड झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.पोलिसांनी उपलब्ध डिजिटल पुरावे, भ्रमणध्वनी संदेश आणि अन्य माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेला गोपाल मराठे हा नंदुरबार तालुक्यातील दहिंदूले गावचा रहिवासी असून, तो कौटिल्य अकॅडमीचा विद्यार्थी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

नंदुरबार तपासाचे केंद्र

या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेकडून नंदुरबारमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा पेपरफुटी प्रकरणाशी वारंवार संबंध समोर येत असल्याने तपासात नंदुरबार हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.प्रकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अमृत पाटील आणि ऋतुजा पाटील यांना घेऊन तपास पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी ऋतुजा पाटील हिला अटक करण्यात आली.

इतर परीक्षांमध्येही गैरप्रकार झाला का?

गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगाने यापूर्वीही परीक्षा पेपर किंवा गोपनीय माहिती बाहेर गेली होती का, तसेच अन्य परीक्षा किंवा भरती प्रक्रियेत अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमपीएससीच्या अन्य परीक्षांच्या प्रक्रियेबाबतही चौकशीचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, गोपाल मराठे यांनी अलीकडच्या काळात काही मालमत्ता खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या मालमत्ता व्यवहारांचा कथित पेपरफुटी प्रकरणाशी काही आर्थिक संबंध आहे का, तसेच गैरप्रकारातून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी करण्यात आला आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेकडून अधिकृत माहितीला दुजोरा नाही

मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारमध्ये वारंवार दाखल होत असले, तरी तपासातील महत्त्वाच्या बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यास पथकाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तपास नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहे, कोणाकडून कोणती माहिती घेतली जात आहे आणि पोलिसांच्या हाती कोणते ठोस पुरावे लागले आहेत, याबाबतचे अधिकृत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande