यवतमाळ : ‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
यवतमाळ, 01 सप्टेंबर (हिं.स.)। दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले ‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर आहेत. अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. जवळपास २०१४ पासून गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती जिल्ह्यातील संपूर्ण
‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर सण, उत्सवाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा निर्णय;


यवतमाळ, 01 सप्टेंबर (हिं.स.)। दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले ‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर आहेत. अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. जवळपास २०१४ पासून गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस ठाण्यातून मागविण्यात आली आहे.

आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळीसारखे सण-उत्सव आहेत. संपूर्ण सण, उत्सव शांततेत पार पडणे आवश्यक आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस दलावर आहे. अप्रिय घटना घडू नये, याची खबरदारी म्हणून कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्!यांवर कायद्याचा बडगा उगारल्या जाणार आहे. यात प्रामुख्याने विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई करावी, असे निर्देश अमरावती विशेष पोलिस महानिरीक्षकांनी नुकत्याच पार पडलेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना अवगत करण्यात आले आहे. २०१४ पासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील ‘हिस्ट्रीशीटर’ तसेच दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. त्यात गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीचीसुद्धा कारवाई प्रस्तावित केल्या जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमपीडीए, मोक्काच्या कारवाया वाढणार

गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेल्या टोळ्यासुद्धा पोलिसांच्या निशाण्यावर आहे. मागिल दीड ते दोन महिन्यात अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन, तर उमरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात यात नक्कीच वाढ होणार आहे.

त्या तीन ठाण्यावर ‘फोकस’

दोन समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम काही टवाळखोर करतात. अशा कृत्यावर निर्बंध लागावे, याकरिता पोलिसांनी आतापासूनच पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दिग्रस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारीक, सारिक घडामोडीवर विशेष ‘फोकस‘ ठेवल्या जाणार आहे.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande