
जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) | जळगाव शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून ५५ वर्षीय तस्कराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून इफेड्रीन पावडर,गांजा आणि दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना जळगावातील एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीकडून अमली पदार्थांची विक्री केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक काळे यांच्या सूचनेनुसार पथकाने कारवाईची तयारी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गांगणे यांच्या कार्यक्षेत्रात तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण वाडे यांच्या उपस्थितीत रात्री सुमारे ११.४० वाजता दर्गा परिसरातील रोडवर सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामानंदनगर, मेहरूण, जळगाव) हा मोपेड घेऊन येताना पोलिसांना दिसला.पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले.
यामध्ये १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर, २ किलो ११४ ग्रॅम गांजा तसेच सुझुकी बर्गमन दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच या कारवाईत इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले.प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त केलेल्या इफेड्रीन व गांजामध्ये अमली पदार्थांचे अंश असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इफेड्रीनचा वापर ‘एमडी’ अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो, तर गांजाचीही स्वतंत्रपणे तस्करी केली जात होती. या प्रकरणी आरोपी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर