
परभणी, 01 सप्टेंबर (हिं.स.)।मराठा समाजाच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पाथरी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी(दि. २) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथरी तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या रास्ता रोको आंदोलनाबाबत तहसील प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती कार्यवाही व सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. सेलू कॉर्नर येथे होणार आंदोलन बुधवारी सकाळी १० वाजता सेलू कॉर्नर येथे मराठा समाजबांधव एकत्र येणार असून, विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे पाथरी शहरासह परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, “मराठा समाजाच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis