
गेवराईतील 5 ते 6 जणांचा अंतरवालीमार्गे प्रवास
बीड, 01 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षण आणि मराठा जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला असून, त्यासाठी १२ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.
गेवराई तालुक्यातील गुळज येथून पाच ते सहा मराठा बांधव आजच बैलगाडी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे बांधव प्रथम अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून, त्यानंतर मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली.
मराठा समाज बांधवांनी ५ ते १२ जानेवारीदरम्यान मुंबईकडे पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार काही बांधव मोटारसायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर, टेम्पो आणि ट्रक अशा विविध वाहनांमधून मुंबईकडे रवाना होत असल्याचे काळकुटे यांनी सांगितले. मुंबई परिसरात पोहोचल्यानंतर काही जण नातेवाईकांकडे राहणार असून, वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी बैलगाड्या आणि इतर वाहने उभी केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार मराठा समाज बांधव आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्याकडे जाऊ शकतात, असेही काळकुटे यांनी सांगितले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्यावरही गंगाधर काळकुटे यांनी टीका केली. हाके हे ओबीसी समाजाच्या समस्या मांडण्यासाठी किंवा मागण्या करण्यासाठी मुंबईला गेले असते, तर त्यांना प्रतिसाद मिळाला असता. मात्र, ते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी जात असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा काळकुटे यांनी केला.
लक्ष्मण हाके यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा दावाही काळकुटे यांनी केला. तसेच, छगन भुजबळ आणि वाघमारे यांची भूमिका वेगळी असून हाके यांच्या भूमिकेला सर्व ओबीसी समाजाचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटले. हाके यांच्या आंदोलनात सामान्य ओबीसी समाज सहभागी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराईतून बैलगाडीने मुंबईकडे निघालेल्या या बांधवांच्या प्रवासाकडे आता लक्ष लागले आहे.----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis