
बीड, 01 सप्टेंबर (हिं.स.)। गायी व म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला आणि शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळणी (ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी गोविंद आण्णा गित्ते यांची मुलगी रुतुजा (वय २५ वर्षे) हिचा विवाह बनकरंजा (ता. केज) येथील अंकुश जनार्धन नागरगोजे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुरळीत गेल्यानंतर, नवीन गायी व म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्यांनी लावला. यासाठी तिला सातत्याने मारहाण करून, उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. माहेरील मंडळींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सासरच्या मंडळींचा जाच थांबला नाही.
या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून रुतुजा हिने विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने धारूर व नंतर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने सासरच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले होते.
या प्रकरणी मृत रुतुजा हिचे वडील गोविंद गित्ते यांच्या तक्रारीवरून पती अंकुश जनार्धन नागरगोजे (वय ३० वर्षे), सासरे जनार्धन जग्गनाथ नागरगोजे, सासू नंदुबाई जनार्धन नागरगोजे, दीर गजेंद्र जनार्धन नागरगोजे (सर्व रा. बनकरंजा, ता. केज) आणि नणंद मनिषा दत्ता मुंडे (रा. सोनहिवरा, ह.मु. अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३(५), ८० आणि ८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरम हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis