जळगाव बायपास प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी–जळगाव नवीन बायपासच्या कामाची गुणवत्ता, ओव्हरब्रिजचा भराव खचणे आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सातत्याने N
जळगाव बायपास प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी–जळगाव नवीन बायपासच्या कामाची गुणवत्ता, ओव्हरब्रिजचा भराव खचणे आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सातत्याने NHAI व प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता. NHAIला तीन वेळा निवेदने देण्यासह पोलीस प्रशासनाकडे जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली होती. अखेर जळगाव तालुका पोलिसांनी बायपासचे काम करणाऱ्या ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता व संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा क्र. २६२/२०२६ दाखल केला आहे. यात भारतीय न्याय संहितेतील कलम १०५ अर्थात सदोष मनुष्यवधाशी संबंधित गंभीर कलमासह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. पावसामुळे बायपासवरील ओव्हरब्रिजचा भराव खचल्यानंतर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट २०२६ रोजी देशमुख यांनी NHAIला लेखी निवेदन देऊन संभाव्य जीवितहानीचा इशारा दिला होता. सुरक्षित लेन सुरू करणे, शहरातील अवजड वाहतुकीचा ताण कमी करणे आणि तातडीच्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्याने NHAIला एकूण तीन लेखी निवेदने देऊन रोड सेफ्टी ऑडिट, खड्डे दुरुस्ती, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, सूचना फलक, प्रकाशव्यवस्था व वाहतूक नियंत्रणाची मागणी करण्यात आली. वाढत्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडेही जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी करण्यात आली. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र निवेदन देऊन NHAI, पोलीस, महानगरपालिका व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक, तातडीचे रोड सेफ्टी ऑडिट आणि अधिकारी-कंत्राटदारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देशमुख यांनी केली. या कालावधीत महामार्गावरील दुर्घटनांमध्ये मंगला अर्जुन माळी (५ ऑगस्ट), प्रेमराज शिवराम चौधरी (२० ऑगस्ट), योगेश कडू महाजन (२० ऑगस्ट) आणि अनिरुद्ध सुरेश डहाके (२३ ऑगस्ट) यांच्यासह नागरिकांचे बळी गेले. बळींची संख्या वाढत असतानाच देशमुख यांनी प्रशासनाला वारंवार सावध करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी अधिक तीव्र केली. यानंतर ३० ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सुमारे २ ते २.१५ वाजता ममुराबाद–आसोदा बायपास सर्व्हिस रोड परिसरात ट्रक क्र. MH 05 DK 5314 आणि तवेरा क्र. MH 48 P 0755 यांच्यात भीषण अपघात झाला. यात शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. या अपघाताबाबत रामचंद्र ईश्वर महाजन यांच्या फिर्यादीवरून ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा क्र. २६१/२०२६ BNS कलम १०६(१), १२५(अ)(ब), ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत दाखल करण्यात आला. रस्त्याच्या कामाची स्थिती तसेच दुर्घटनास्थळी आवश्यक बॅरिकेडिंग, सूचना फलक व इतर सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा क्र. २६२/२०२६ नोंदविला. या गुन्ह्यात BNS कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन (सुधारणा) कायदा कलम १९८-अ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ व ४ लावण्यात आले आहेत. यातील कलम १०५ हे सदोष मनुष्यवधाशी संबंधित गंभीर कलम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande