
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्हा पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकांवरील संशयित लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ‘मिशन सुधार’ मोहीम प्रारंभ करण्यात आली आहे. आतापर्यंत १७ हजारांवर लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ५३ हजार ४८८ संशयित लाभार्थी आढळून आले असून, त्यापैकी सुमारे ३१.७८ टक्के लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. अद्याप ३६ हजार ४८८ लाभार्थ्यांची पडताळणी बाकी आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी सुरू आहे. दुबार नोंदी, पात्रतेबाबत संशय असलेले लाभार्थी तसेच शासकीय निकषांमध्ये न बसणाऱ्या नोंदींची पडताळणी करून अचूक लाभार्थी निश्चित करण्यावर पुरवठा विभागाचा भर आहे. या मिशन नंतर धान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने धान्याचा पुरवठा होणार आहे. याच उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात एकूण सहा लाख ७० हजार २६ शिधापत्रिका असून, त्यामध्ये २५ लाख ७८ हजार ९७ लाभार्थी आहेत. या नोंदींच्या तपासणीत ५३ हजार ४८८ संशयित लाभार्थी आढळले आहेत. यापूर्वी १० हजार २८२ लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली होती. आता हा आकडा १७ हजारांवर पोहोचला असून, मोहिमेंतर्गत आणखी ३६ हजार ४८८ लाभार्थ्यांची पडताळणी करणे बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात मोहिमेला आणखी गती देण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे. काही तालुक्यांमध्ये हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कमी प्रगती असलेल्या तालुक्यांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी