
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)
परसापूर, भिलोना, शिंदी बुद्रूक व पथ्रोट परिसरातील शेतकऱ्यांना रात्री सिंगल फेज वीजपुरवठा मिळावा, यासाठी ऑगस्ट २०१८ पासून सुरू असलेली सुविधा मागील काही दिवसांपासून मुंबई येथील महावितरणच्या आदेशामुळे बंद केली जात आहे. त्यामुळे शेतातील कामे व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पथ्रोट वीज उपकेंद्रांतर्गत एजीवर कार्यरत तणस व ढाबा फीडरवरून शेतकऱ्यांना रात्री सिंगल फेज वीजपुरवठा दिला जातो. मात्र, दररोज सायंकाळच्या सुमारास मुंबई येथील महावितरण कार्यालयातून भारनियमनाचा संदेश येत असल्याचे सांगून हा वीजपुरवठा बंद केला जात आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या कामांची व्यवस्था करून रात्री घरी परतण्यापूर्वी शेतकरी जनावरांचा चारापाणी व सुरक्षेची व्यवस्था करतात. अशावेळी शेतात सुरू असलेला एक दिवा त्यांना मोठा आधार देतो. सिंगल फेज वीजपुरवठा बंद झाल्याने रात्री शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना साप, विंचू तसेच इतर हिंस्त्र प्राण्यांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर शेतातील झोपड्यांमध्ये चोरीच्या घटनांचीही भीती आहे. मागील काही दिवसांपासून चोरट्यांकडून ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल, शेती साहित्य तसेच बोअरवेलमधील केबल चोरीचे प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच नैसर्गिक संकटांमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. रात्री सिंगल फेज सुरू राहिल्यास शेतातील रखवालदार मुक्कामी राहण्यास तयार होतात. त्यामुळे शेतीसह साहित्याचीही सुरक्षा होण्यास मदत होते. महावितरणने शेतकऱ्यांची समस्या गांभीर्याने घेऊन रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करावा, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत महावितरणचे उपविभागीय अभियंता तुषार गांजरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
शेतात पाळीव जनावरे बांधलेली असतात. रात्री घरी जाण्यापूर्वी त्यांची व्यवस्था करावी लागते. सिंगल फेजमधील एका दिव्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळतो. मात्र, महिनाभरापासून वीजपुरवठा वेळेवर बंद होत असल्याने नुकसान वाढले आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
विजय लिल्हरे, शेतकरी.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी