
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)।शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी सचिन स्वामी यांनी मुख्याधिकारी, परळी वैजनाथ नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, काही दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र, काढलेले अतिक्रमण पुन्हा पूर्ववत बसले असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.येत्या काळात श्री गणेश उत्सव तसेच श्री महालक्ष्मी सण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण राहिल्यास वाहतूक कोंडीबरोबरच अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.विशेषतः मोठा मार्केट, स्टेशन रोड, टॉवर परिसरासह शहरातील सर्व भागांतील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने तत्काळ ठोस कारवाई न केल्यास योग्य ते आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मा. पंकजा मुंडे, मा. धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी, बीड यांना देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis