गणेशभक्तांसाठी एसटी सज्ज, पनवेलमध्ये २०० ‘लालपरी’;
- चालकांचा बसमध्येच मुक्काम! सुविधांपासून वंचित रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) २०० हून अधिक ‘लालपरी’ बसगाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. न
200 ‘Lalpari’ buses in Panvel; drivers staying on board!


- चालकांचा बसमध्येच मुक्काम! सुविधांपासून वंचित

रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) २०० हून अधिक ‘लालपरी’ बसगाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. नवी मुंबई विमानतळालगतच्या उलवे-करंजाडे मार्गावर या बसगाड्यांसाठी तात्पुरता थांबा करण्यात आला असून, शुक्रवारी दुपारपासून बसगाड्या टप्प्याटप्प्याने कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. मात्र, बसगाड्यांसाठी वाहनतळ आणि चालकांच्या विश्रांतीची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने चालकांना बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली.

पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि राज्यातील विविध आगारांतून गुरुवारी रात्री बसगाड्या पनवेलमध्ये आणण्यात आल्या. पनवेलमध्ये इंधन भरण्यानंतर त्यांना कोकणातील विविध मार्गांवर रवाना करण्यात आले. मुंबईतील परळ आगारातून कोकणवासीयांनी या विशेष बसगाड्यांचे आरक्षण काही महिन्यांपूर्वीच केले होते. मुंबई उपनगर व ठाणे परिसरातील प्रवाशांसाठी विविध लोकप्रतिनिधींनीही बसगाड्यांचे आरक्षण केले आहे.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाही एसटी बसगाड्या उभ्या करण्यासाठी मोठे वाहनतळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विमानतळालगतच्या रस्त्यावर बसगाड्या उभ्या करण्यात आल्या. चालकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह नसल्याने त्यांना बसमध्येच झोपावे लागले.

चालकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधाही अपुरी असल्याची तक्रार आहे. एसटीकडून सीलबंद पाण्याच्या बाटल्या आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी सकाळचा नाश्ता मिळाला नसल्याचे चालकांनी सांगितले. परिसरापासून पाच-सहा किलोमीटरपर्यंत हॉटेलची सुविधा नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande