
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी व धाडसत्र मोहिम राबवले. कारवाईत माजलगावच्या क्वालिटी बेकरीचा परवाना निलंबित केला असून बीडच्या कुशल ट्रेडिंग कंपनीतून ८०८७ किलो तेलसाठाही जप्त करण्यात आला. या विभागाने १४ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा आणि वाहनही जप्त केले.
शहरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करत १४ लाख ९० हजार ८८४ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण १२ लाख ६३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असून वाहनचालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्रमांक (एम. एच. २३ एस. ५५२२) जप्त करण्यत आले. ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आणि नऊ लाख रुपयांचे वाहन असा १२ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन चालक
दत्ता घोडके व साथीदार ओंकार घोडके यांच्या विरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माजलगाव शहरातील मे. क्वालिटी बेकरी, या उत्पादन पेढीचीही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पेढीतील कामगार अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात अन्नपदार्थ हाताळत असल्याचे आढळून आले. तसेच कीटक नियंत्रण, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा अहवाल आणि अन्य आवश्यक अभिलेखे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे पालन होत नसल्याचे आढळल्याने पेढीतून दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीतील त्रुटी लक्षात घेऊन व्यापक जनआरोग्य हिताच्या दृष्टीने बेकरीचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis