आदिशक्ती संस्थेच्या तिसऱ्या साहित्य संमेलनाचे रविवारी आयोजन
डॉ. श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी; डॉ. सतीश तराळ यांच्या हस्ते उद्घाटन अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने तिसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी (ता. १३) मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात करण्यात आल
आदिशक्ती संस्थेच्या तिसऱ्या साहित्य संमेलनाचे रविवारी आयोजन


डॉ. श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी; डॉ. सतीश तराळ यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने तिसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी (ता. १३) मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्याकडे आहे.रविवारी सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, संस्कृती आणि वाचनाची परंपरा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय कुणबी मराठा क्षत्रीय महासंघ आणि मराठी विभाग, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय यांच्या सहकार्याने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या अध्यक्ष डॉ. शोभा गायकवाड यांच्या पुढाकारातून संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला अतिथी म्हणून डॉ. अशोक पाटील, डॉ. विलास आंबेकर, समाजभूषण प्रमोद ठोंबरे, पंढरीनाथ बोकारे, किसन बोंद्रे, समाजसेवक सुदर्शन गांग आणि डॉ. स्मिता सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande