
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
‘एल निनो’च्या प्रभावाने कमजोर पडलेल्या मॉन्सूनमुळे यंदा पर्जन्यमान अपेक्षित सरासरी गाठू शकले नाही. शेती हंगामावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत असून खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामातही पाणी संकट घोंगावण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५८ टक्के जलसाठा झाला असून परतीच्या पावसावर भिस्त अवलंबली आहे. यंदा मॉन्सून विलंबाने आला असतानाच ‘एल निनो’च्या प्रभावाने तो कमजोर बनला आहे. हवामान खात्याने यंदा पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज आधीच वर्तविला आहे. एक जून ते १० सप्टेंबर, या पावसाच्या कालावधीत जिल्ह्यात ४२८ मी. मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ५६ टक्के आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी राहिल्याने प्रकल्पांतील पाणीसाठाही अपेक्षित सरासरी गाठू शकला नाही. आजमितीला सिंचन प्रकल्पांत ५८ टक्के (६११ दलघमी) जलसाठा झाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमधील परतीच्या पावसावर जलसाठा वाढला असला तरी या महिन्यातील पहिले दहा दिवस कोरडे गेले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासह सिंचनाचे मोठे क्षेत्र अवलंबून असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ५२१ मी. मी. पाऊस झाला आहे. पावसाळ्यापूर्वी या धरणात चाळीस टक्क्यांच्या जवळपास जलसाठा होता. त्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत केवळ ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणात ५७ टक्के पाणीसाठा आहे. जवळपास अशीच स्थिती मध्यम प्रकल्पांचीही होती, तर लघुप्रकल्पांतील साठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या सात मध्यम व ४८ लघुप्रकल्पांत १०४७ दलघमी प्रकल्पीय जलसाठ्याच्या तुलनेत ६११ दलघमी साठा आहे. कोरडवाहू पट्ट्यातील अमरावती जिल्ह्यात सिंचनाखाली ८८ हजार ५११ हेक्टर क्षेत्र असून रब्बी हंगामात एक लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात येते. यापैकी ७० हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी स्वनिर्मित (विहिरी, बोअरवेल) केलेल्या सिंचनाच्या सोयी आहेत. तर उर्वरित ८० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. रब्बी हंगामात गहू व हरभरा ही मुख्य पिके असून पूर्णतः सिंचनावर अवलंबलेली आहेत. गव्हास पाच पाळ्या, तर हरभऱ्यास कमीत कमी तीन पाळ्या पाणी द्यावे लागते. जलसंपदा विभाग दरवर्षी पाच पाळ्या पाणी कालव्यांच्या माध्यमातून सोडते. यंदा धरणांमधील जलसाठा बघता पाच पाळ्या पाणी सोडणे शक्य होणार नसल्याचे जलसंपदा अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पर्जन्यमान चांगले राहिले आणि जलपातळी वाढली तरच पाच पाळ्या देणे शक्य होणार आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामावर पाणी संकट कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी