अमृततर्फे राज्यभरात विश्वबंधुत्व पंधरवडा सुरू
रत्नागिरी, 11 सप्टेंबर (हिं.स.) । स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक शिकागो भाषणातील सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा विचार समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यभरात आजपासून विश्वबंधुत्व पंध
Amrut sanstha


रत्नागिरी, 11 सप्टेंबर (हिं.स.) । स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक शिकागो भाषणातील सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा विचार समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यभरात आजपासून विश्वबंधुत्व पंधरवडा सुरू झाला. यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाची मूल्ये केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या पंधरवड्यात शिकागो भाषण कृती कार्यक्रमांतर्गत स्वामी विवेकानंदांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या स्तरावर विविध स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि खाजगी आस्थापनांचा त्यात सक्रिय सहभाग घेतला जाईल.

आजच सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांसाठी https://vbd.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र हे ब्रीद समोर ठेवून नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande