गव्हाफरकाडे गावात ‘करी’च्या दिवशी मांसाहार बंद
गावाच्या आरोग्य व सुख-समृद्धीसाठी ग्रामस्थांची श्रद्धा अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : पोळ्याच्या ‘करी’च्या दिवशी अनेक ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हाफरकाडे गावाने तब्बल ९३ वर्षांपासून एक अनोखी परंपरा जपली आह
पोळ्यानंतर ‘कर’मध्ये मांसाहाराला बंदी; श्रद्धेची परंपरा आजही कायम


गावाच्या आरोग्य व सुख-समृद्धीसाठी ग्रामस्थांची श्रद्धा

अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : पोळ्याच्या ‘करी’च्या दिवशी अनेक ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हाफरकाडे गावाने तब्बल ९३ वर्षांपासून एक अनोखी परंपरा जपली आहे. या दिवशी गावातील एकही व्यक्ती मांसाहार करीत नाही. तसेच सायंकाळपासून रात्रभर गावातील जागृत हनुमान मंदिरात कापूर प्रज्वलित करून सामूहिक प्रार्थना केली जाते.

गावात वर्षभर रोगराई, आजारपण अथवा कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे आणि गावात सुख-समृद्धी नांदावी, या श्रद्धेतून ही परंपरा सुरू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

‘करी’च्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गावातील वातावरण भक्तिमय होते. हनुमान मंदिरात कापूर प्रज्वलित करून पूजा-अर्चा केली जाते. गावातील लहान-थोरांसह पुरुष मंडळी मंदिरात एकत्र येतात आणि रात्रभर जागरण करतात. विशेष म्हणजे, सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणीही गावाबाहेर जात नाही. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हनुमानाची पूजा व सामूहिक प्रार्थना करतात.

गावावर कोणतीही बाधा येऊ नये, रोगराईपासून गावाचे संरक्षण व्हावे आणि वर्षभर गावात सुख-समृद्धी नांदावी, अशी सामूहिक भावना या परंपरेमागे आहे.

यासंदर्भात गव्हाफरकाडे गावचे माजी सरपंच मुकेश राठी म्हणाले की, बदलत्या काळात अनेक पारंपरिक प्रथा लोप पावत असताना गव्हाफरकाडे येथील ग्रामस्थांनी तब्बल ९३ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली आहे. त्यामुळे ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित न राहता गावकऱ्यांच्या एकजुटीचे, सामूहिक सहभागाचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande