
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात धारुर तहसीलमध्ये शिबीर
राज्य शासनाच्या सूचनेनुसार
धारूर तहसील कार्यालयात धारूर महसूल मंडळातील कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी (व्हॅलिडिटी) येणाऱ्या अडचणींचे निराकरण व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना आवश्यक
कागदपत्रे, कुणबी नोंदी तसेच जात वैधता प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरात धारूर महसूल मंडळातील एकूण सहा जणांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी नोंदविली. प्राप्त मागण्यांची संबंधित गावातील ग्रामस्तरीय समितीमार्फत चौकशी करून नियमानुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच कुणबी नोंद आढळल्यानंतर प्रमाणपत्र व जात वैधतेसाठी
आवश्यक प्रक्रियेबाबतही लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, धारूर मंडळ अधिकारी कपिल गोडसे यांच्यासह धारूर मंडळातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र साठी कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis