माणसांच्या प्रश्नांसोबत जल, जंगल, जमिनीच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर - डॉ. अभय बंग
चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। विकासाच्या नावावर आपण खाणी आणि कारखान्यांचा शाप भोगला आहे. आता पर्यावरण आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या घडीला जिवंत राहणे महाग होत असून, आजारांसोबतच आपण जगत आहोत. मात्र, मानवी आरोग्याच्या प्र
माणसांच्या प्रश्नांसोबत जल, जंगल, जमिनीच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर - डॉ. अभय बंग


चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

विकासाच्या नावावर आपण खाणी आणि कारखान्यांचा शाप भोगला आहे. आता पर्यावरण आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या घडीला जिवंत राहणे महाग होत असून, आजारांसोबतच आपण जगत आहोत. मात्र, मानवी आरोग्याच्या प्रश्नांसोबतच जल, जंगल आणि जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे, असे मत विख्यात समाजसेवक, पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.

पंचायत समिती, बल्लारपूर आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले आरोग्य साहित्य संमेलन बल्लारपूर येथील गोंडराजे बल्लाळशा नाट्यगृहात नुकतेच पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. अभय बंग बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. अल्का वाढई यांनी केले. स्वागताध्यक्ष गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर, तहसीलदार रेणुका कोकाटे, डॉ. प्रशिक वाघमारे, सचिन माळवी, शुभांगी वऱ्हाटे, डॉ. अश्विनी कांबळे, नरेशकुमार बोरीकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, जगात दरवर्षी सुमारे ३० लाख लोक दारूमुळे, तर ८० लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. चंद्रपुरात महिलांनी लढा देऊन मिळविलेली दारूबंदी आपण गमावली. चंद्रपूरच्या दारूबंदीमुळे शासनाचे आर्थिक नुकसान कसे होत आहे, हे पटवून देण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले; मात्र, महिलांचा हा लढा आपण विसरता कामा नये. ‘आरोग्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी शपथ प्रत्येकाने घ्यावी आणि ‘आरोग्य स्वराज्य’ ही राज्यात लोकचळवळ व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणारे डॉक्टर व आशा स्वयंसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. लेखक गोपाल शिरपूरकर लिखित ‘लंकापर्व’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande