
चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी, घोडपेठच्या विद्यमाने शेतकऱ्यांचा आनंददायी आणि परंपरेचा सण असलेल्या बैल पोळा निमित्त भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे पार पडली. येथे बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी मंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास हरीश्चंद्र अहीर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश देवतळे, चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, यांचेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी बांधवांना हंसराज अहीर यांनी बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. हा पारंपारीक सोहळा निरंतरपणे कायम राहण्याकरिता शेतकरी बांधवांनी पशुपालनातून गौरक्षणाचे संरक्षण व संवर्धन करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले. रघुवीर अहीर, रविंद्र शिंदे, अनिल धानोरकर व अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
बैल पोळ्यानिमित्त बैलजोड्यांची देखणी सजावट करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या बैलजोडी मालकांचे प्रथम क्रमांक मारोती तेलमुले, द्वितीय क्रमांक अरूण मिलमिले, तृतीय क्रमांक राजु रासेकर, चतुर्थ क्रमांक संतोष पोडे, रमेश जोगी, वैभव निमकर, ईश्वर चिडे स्थानांपर्यंतच्या बैलजोडी मालकांचा शाल, स्मृतीचिन्ह व रोख राशी देऊन सन्मान केला व स्पर्धेत सहभागी सर्व बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव