
चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात चंद्रपूर जिल्ह्यातील 4 हजार 241 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 हजार 50 तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 3 हजार 191 शेतकरी सभासदांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या, दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या तसेच दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी रु. 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे.
महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर राज्यातील बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे.
महाआयटीकडून संगणकीय संस्करण करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 12.58 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांत रु. 10 हजार 115 कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत राज्यातील 3.55 लाख शेतकरी या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी शासनाकडून दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 3.55 लाख शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरणासाठी समावेश करण्यात आला असून, त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 4 हजार 241 शेतकरी आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे-
दुसऱ्या यादीत समाविष्ट शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2026 रोजीच्या आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून, दि. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या काही शेतकऱ्यांची दि. 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी रु. 2 लाखांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जखाती निरंक करण्यात येणार आहेत.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी मयत शेतकरी तसेच वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित केली आहे.
पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मंजूर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव