यवतमाळ - पात्र उमेदवारांचे आता मंगळवारी समुपदेशन
यवतमाळ , 11 सप्टेंबर (हिं.स.) पवित्र पोर्टलवरील पात्र ५१० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आटोपली आहे. आता मंगळवारी (ता. १५) उमेदवारांचे समूपदेशन घेतले जाणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी २०२५ नुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक
यवतमाळ - पात्र उमेदवारांचे आता मंगळवारी समुपदेशन


यवतमाळ , 11 सप्टेंबर (हिं.स.)

पवित्र पोर्टलवरील पात्र ५१० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आटोपली आहे. आता मंगळवारी (ता. १५) उमेदवारांचे समूपदेशन घेतले जाणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी २०२५ नुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदभरती घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही भरती मुलाखतीविना घेतली जाणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’वर ७०१ रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जागेच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पर्याय नोंदविणे आवश्यक होते. यवतमाळ जिल्ह्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेल्या पात्र ५१० उमेदवारांची यादी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी प्राप्त झाली होती. या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी दोन ते तीन सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेत पार पडली. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. आता या उमेदवारांना मुलाखतीशिवाय थेट नियुक्ती दिली जाणार आहे. यात एक शिक्षक असलेल्या शाळेला प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने वणी, झरी, मारेगाव, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात शिक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवावारी सकाळी ९.३० वाजता उमेदवारांना जिल्हा परिषदेत समूपदेशासाठी बोलाविण्यात आले आहे. उमेदवारांना शाळेचे प्राधान्य नोंदविता येणार आहे. त्यानंतरच नियुक्ती आदेश दिले जाणार आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande