
परभणी, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके सुकून गेल्याने शेतकर्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा परभणी शहर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती विकास प्रभाकर लंगोटे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दत्ता भरणे यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके अक्षरशः सुकून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून ती त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकर्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विकास भाऊ प्रभाकर लंगोटे आणि झोपडपट्टी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis