
नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी गणेश मंडळे व मंदिरांमध्ये दर्शनासाठी येताना आवश्यक ती खबरदारी घेऊन उत्सव आनंदात, सुरक्षित वातावरणात साजरा करावा व भाविकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी केले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्यात १4 ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत एकूण २ हजार ५८1 गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. गणेशमूर्तींचे दि. १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दिवसनिहाय विसर्जन होणार आहे.
गणेशोत्सव काळात भाविकांनी दर्शनासाठी येताना कमीत कमी साहित्य सोबत आणावे. पैसे व मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्यावी. गणेश मंडळ अथवा मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाणे टाळावे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यास हात न लावता तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच आपली वाहने सुरक्षित व नियोजित पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत. अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती अधिकृत यंत्रणेकडून खात्री करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI