
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। देशाची राजधानी नवी दिल्ली येथे १२ आणि १३ सप्टेंबरदरम्यान १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ सप्टेंबर रोजी भारतात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिक्सच्या महत्त्वावरून काँग्रेसमध्येच वेगवेगळी मते समोर आली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ब्रिक्सच्या मागील परिषदांमधून भारताला ठोस फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त केले, तर पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ब्रिक्स परिषद ही भारताच्या कूटनीतिक सामर्थ्याचे प्रदर्शन करणारी महत्त्वाची संधी असल्याचे म्हटले आहे.
शशी थरूर यांनी ब्रिक्सच्या महत्त्वावर भाष्य करताना हा समूह ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. ब्रिक्समधील ११ देश जगाच्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात तसेच जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के हिस्स्याचे प्रतिनिधित्व करतात, असे त्यांनी नमूद केले. या शिखर परिषदेच्या निमित्ताने सुमारे डझनभर राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख भारतात येत असल्याने ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब असल्याचेही थरूर यांनी सांगितले. विविध देशांना एकत्र आणण्याची भारताची कूटनीतिक क्षमता या परिषदेतून अधोरेखित होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ब्रिक्सच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किती राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान परिषदेला येत आहेत, याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, मागील दोन-तीन ब्रिक्स शिखर परिषदांमधून कोणताही ठोस फायदा किंवा ठोस निष्कर्ष मिळालेला दिसत नसल्याचे चिदंबरम यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका करत भारताच्या प्रगतीवर नाराज असलेल्या व्यक्तीप्रमाणे चिदंबरम यांचे वक्तव्य असल्याचा आरोप केला.
दरम्यान, ब्रिक्स परिषदेसमोर काही आव्हानेही असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले. विशेषतः जागतिक प्रश्नांवर सदस्य देशांमध्ये एकमत निर्माण करणे ही मोठी अडचण ठरू शकते. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सर्वसंमतीने संयुक्त घोषणा जारी न होता भारताला अध्यक्षीय घोषणा प्रसिद्ध करावी लागली होती. आगामी शिखर परिषदेत मतभेद दूर करून सर्वसंमती निर्माण करण्यात भारताच्या राजदूतांसमोर मोठे आव्हान असणार असल्याचे थरूर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule