
मुंबई, 11 सप्टेंबर (हिं.स.)। सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असतानाही देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होते. यंदाही मान्सून वेळेत परतण्याचा सुरुवातीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सध्याची हवामानस्थिती पाहता मान्सूनचा मुक्काम आणखी काही काळ लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात देशाच्या अनेक भागांत पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. काही ठिकाणी काही तास, तर काही भागांत एक-दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जोरदार हजेरी लावली. मात्र, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी देशातील विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला काही भागांत पावसाची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र, १५ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका आहे. मध्य प्रदेशातही अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही पुढील चार ते पाच दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाचा विस्तार वाढण्याची शक्यता असून, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, तेथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule