महाराष्ट्राची वज्रमुठ दाखवा, लंडनच्या गुंतवणूकदार बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आवाहन
* जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अपेक्स बॉडी उभारणार लंडन / मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्राच्या विकासाची क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि जगभरातील मराठी उद्योजकांची ताकद या तीनही बाबींचा संगम घडवून आणण्याची गरज असल्याचे प्रतिप
एकनाथ शिंदे लंडन गुंतवणूकदार संवाद


* जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अपेक्स बॉडी उभारणार

लंडन / मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्राच्या विकासाची क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि जगभरातील मराठी उद्योजकांची ताकद या तीनही बाबींचा संगम घडवून आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनमध्ये गुंतवणूकदारांशी बोलताना काल केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत समन्वयाने काम होत असल्याचा संदेश त्यांनी गुंतवणूकदारांसमोर ठेवला. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील उद्योगसमूहांनी पुढे यावे, असे आवाहन करतानाच जगभरातील मराठी माणसांची वज्रमुठ व्हावी असा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

सीमा प्रश्नावर ठाम

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचाही संदर्भ यावेळी चर्चेत आला. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नाशी महाराष्ट्राची भूमिका जोडलेली असून हा विषय केवळ राजकीय नसून मराठी अस्मितेशी संबंधित असल्याची भूमिका महाराष्ट्रातील सरकारने सातत्याने मांडली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मराठी भाषिकांच्या हक्कांच्या बाजूने महाराष्ट्र सरकार ठाम आहे आणि याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार आहोत.

सरकारमध्ये समन्वय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक कर्तबगार मुख्यमंत्री असून राज्याच्या विकासासाठी त्यांच्याशी संपूर्ण समन्वय ठेवून आम्ही काम करत आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला पुढील काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारचा भर पायाभूत सुविधा, उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीवर आहे.

थेट निर्णय

‘नो रिझन ओन्ली डिसिजन‘ म्हणजेच उगाचच कारणं न दाखवता जागीच निर्णय घेण्याची आपली कामाची पद्धत असून त्यामुळे प्रशासनाला वेग आला असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले

मराठी उद्योजकांना एकत्र आणणार

जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांत काम करत आहे. या सगळ्या शक्तीची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे. जगभरातील मराठी माणसांची ‘वज्रमूठ’ बांधण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करताना यासाठी एक व्यापक अपेक्स बॉडी उभारण्याच्या दिशेने काम करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून पुढाकार घेण्यास सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande