
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य महोत्सवांतर्गत 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन अमरावती जिल्हा प्रशासनाने केले आहे. या स्पर्धेची व्याप्ती तालुका, जिल्हा, राज्य यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी इच्छुक व पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्याganeshotsav.pldmka.co.inया संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. ही स्पर्धा विनामूल्य असून, केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कार्यरत राहणार आहे. स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 50 हजार, 40 हजार आणि 30 हजार रुपये, तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 7 लाख 50 हजार, 5 लाख आणि 2 लाख 50 हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या अन्य मंडळांनाही शासन निर्णयानुसार प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. ही निवड संबंधित स्तरावर गठित करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेच्या सविस्तर अटी, निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पोर्टलला भेट देऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी