
- रायगड जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
रायगड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ आणि विहित कालमर्यादेत मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत विविध शासकीय विभागांच्या तब्बल १ हजार २१२ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, नागरिकांना या सेवांचा ऑनलाइन तसेच ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे.
जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले यांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध शासकीय सेवांचा या कायद्यात समावेश आहे. नागरिकांना ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातूनही या सेवा उपलब्ध करून घेता येतात.पात्र नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा मिळाली नाही किंवा नियमोचित कारणाशिवाय सेवा नाकारण्यात आली, तर संबंधित कार्यालयातील प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे प्रथम अपील करता येते. प्रथम अपिलानंतरही सेवा मिळाली नाही, तर द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे.या दोन्ही स्तरांवरूनही समाधानकारक न्याय न मिळाल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्याविरुद्ध राज्य सेवा हक्क आयोगाकडे तृतीय अपील करता येते.
विलंब झाल्यास दंडाची तरतूद
शासकीय सेवा देण्यास पुरेसे व वाजवी कारण नसताना विलंब केल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्यावर ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या हक्कांची माहिती करून घेत, विहित कालमर्यादेत शासकीय सेवा मिळविण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)