
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग, : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, रायगड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘श्री गणेशा आरोग्याचा-२०२६’ आरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी किशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, धर्मादाय रुग्णालय कार्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) समन्वयक तसेच संबंधित रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणारी आरोग्य शिबिरे, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा, विविध विभागांतील समन्वय आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरीय कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पवार यांनी अभियानाच्या नियोजनाची माहिती दिली.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच सार्वजनिक ठिकाणी ५०० हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)