अमरावती जिल्हा परिषदेत कोल्ह्याचा शिरकाव; वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक कोल्हा आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी ये-जा करीत असतानाच ध्वज रक्षकाच्या निदर्शनास परिसरात कोल्हा आल्याचे दिसून आले. त्यांनी
जिल्हा परिषदेत कोल्ह्याचा शिरकाव; वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू


अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक कोल्हा आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी ये-जा करीत असतानाच ध्वज रक्षकाच्या निदर्शनास परिसरात कोल्हा आल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वनविभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक तातडीने जिल्हा परिषद परिसरात दाखल झाले. पथकाने परिसराची पाहणी करून कोल्हा नेमका कुठे आहे, याचा शोध घेतला. कार्यालय परिसरात कर्मचारी व नागरिकांची वर्दळ असल्याने कोल्ह्याला सुरक्षितपणे पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर होते. वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू मोहीम सुरू केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. कोल्हा ताब्यात घेतल्यानंतर त्याची प्राथमिक पाहणी करण्यात आली.

त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला जवळील पोहरा जंगल परिसरात नेले. तेथे त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. कोल्ह्याला कोणतीही इजा न होता रेस्क्यू करण्यात आल्याने जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरी भागात अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी येण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला तातडीने माहिती द्यावी आणि वन्यप्राण्यांच्या जवळ जाणे अथवा त्यांना पकडण्याचा प्रयत्न टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande