
ई-पीक पाहणीद्वारे पिकाची नोंदणी करणे बंधनकारक आदिवासी विकास महामंडळाचे शेतकऱ्यांना आवाहन
नंदुरबार, 11 सप्टेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादितच्या प्रादेशिक कार्यालय, नंदुरबार अंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ज्वारी (संकरित) व मका या भरडधान्यांची खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पिकाची ई-पीक पाहणी नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांनी दिली आहे.
महामंडळाच्या खरेदी केंद्रावर ज्वारी (संकरित) व मका विक्री करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी अद्ययावत ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि अॅग्रीस्टॅक कार्ड या कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुखांशी संपर्क साधून नाव नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. नाव नोंदणीचा कालावधी 0१ सप्टेंबर २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ असा आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले भरडधान्य खरेदी केंद्रावर विक्रीसाठी कधी आणावा, याबाबत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
प्रमुख खरेदी केंद्र व संपर्क अधिकारी:
टोकरतलाव व सुंदरदे (ता. नंदुरबार): तुषार वळवी (मोबाईल: ९१७५४३९९७१)
वावद (ता. नंदुरबार): मिनाक्षी चौरे (मोबाईल: ९४२१२७५२५८)
प्रतापपूर व शिर्वे (ता. तळोदा): कल्पेश चव्हाण (मोबाईल: ९८६०६४०२४८)
अक्कलकुवा व खापर (ता. अक्कलकुवा): संजय पावरा (मोबाईल: ९४०४५७७२९३)
धडगांव (ता. अक्राणी): जयश्री वळवी (मोबाईल: ९४२१६०५०२२)
मोलगी (ता. अक्कलकुवा): गुलाबसिंग पावरा (मोबाईल: ८२६१८६५७९३)
नवापूर (ता. नवापूर): रंजना वळवी (मोबाईल: ७४९८३७०१७०)
मंदाणा (ता. शहादा): संजय पावरा (मोबाईल: ८२६१८६५७९३)
पिंपळनेर (ता. साक्री): मनोहर गिरासे (मोबाईल: ९४०३९४०९७६)
हरिपूर (ता. यावल जि.जळगाव): गौरव चौधरी (मोबाईल: ८०५५९८२५२७)
शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, आवश्यक कागदपत्रांसह १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक व्यवस्थापक शिरसाठ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर