थकीत कर्जदारांवर कठोर कारवाईचा इशारा
- अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे विशेष वसुली अभियान - धनादेश वसुलीसह लोकअदालतीत दावे दाखल होणार जळगाव, ११ सप्टेंबर (हिं.स.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी विविध कर्ज
थकीत कर्जदारांवर कठोर कारवाईचा इशारा


- अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे विशेष वसुली अभियान

- धनादेश वसुलीसह लोकअदालतीत दावे दाखल होणार

जळगाव, ११ सप्टेंबर (हिं.स.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच एनएएसएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र, कर्जाची वसुली अत्यल्प असल्याने मंजूर कर्जधारकांना कर्ज वितरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे थकीत कर्जदारांनी आपल्याकडील कर्जाची रक्कम नियमित भरावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

महामंडळामार्फत जिल्ह्यात विशेष वसुली अभियान राबविण्यात येत असून, थकीत कर्जदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत कर्जदारांना वसुली भरण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच कर्जदार व जामीनदारांच्या घरी भेट देऊन अंतिम नोटीस देण्यात येणार आहे.सरकारी कर्मचारी जामीनदारांच्या वेतनातून थकीत कर्जाची रक्कम कपात करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता धारक जामीनदारांविरुद्धही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.वसुलीसाठी कर्जदारांनी दिलेले धनादेश बँकेत जमा करण्यात येणार असून, धनादेश परत आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय गाव-वस्ती पातळीवर वसुली मेळावे आयोजित करून थकीत कर्जाची वसुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कर्जाच्या गैरवापरावरही कारवाई

महामंडळाकडून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा गैरवापर करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित लाभार्थ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तसेच थकीत कर्जदारांविरुद्ध लोकअदालतीमध्ये दावे दाखल करण्यात येणार आहेत. थकीत कर्जाची परतफेड न केल्यास संबंधित कर्जदारांच्या कुटुंबीयांनाही भविष्यात महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

नियमित कर्जफेड करण्याचे आवाहन

कायदेशीर कारवाई आणि त्यातून होणारा मनस्ताप टाळण्यासाठी जिल्ह्यातील कर्जदार व जामीनदारांनी आपल्याकडील थकीत कर्जाची रक्कम नियमित भरावी. तसेच सरकारी कर्मचारी जामीनदारांनी संबंधित कर्जदारांना थकीत कर्जाची परतफेड करण्यास प्रवृत्त करून संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास जे. पगारे यांनी केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande