
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस असून सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्या असल्या तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र निघणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, जरांगे पाटलांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. तसेच, मुंबईकडे येणार असल्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता, तर 12 सप्टेंबरपर्यंतची देण्यात आलेली मुदतही संपुष्टात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची पुढील भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता, जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा बांधवांना उद्या अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं आहे.
उद्या 12 सप्टेंबर रोजी 12 वाजता महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शक्यतो प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित रहावे, कोणीही हायगाय करू नका. आता अटीतटीचा सामना आहे, घरी बसून टीव्हीवर बैठक पाहण्याचे दिवस नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. समाजाच्या लेकराची लढाई अंतिम टप्यात आलेली आहे, शक्यतो ज्याला ज्याला शक्य आहे त्याने उद्या बैठकीला हजर रहावे, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी आशीर्वाद द्यायला रस्त्यावर आले तरी खूप झाले. मात्र, ज्यांना येणे शक्य नाही त्यांनीही आपल्या समाजासाठी लेकरासाठी एक दिवस समाजासाठी द्यावा. जो मार्ग जायचा ठरणार आहे, त्या ठिकाणी हातातली कामं टाकून रस्त्यावर येऊन आशीर्वाद देण्यासाठी या. उद्या मुंबईचा मार्ग टाकला जाईल, जिथे मुक्कामी असेल तिथल्या बांधवांनी जेवणाची मुक्कामाची व्यवस्था करावी, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis