
यवतमाळ, 11 सप्टेंबर (हिं.स.) | राज्यात सर्वत्र डीजे कल्लोळ सुरू असताना, आता यवतमाळातही डीजेचा आवाज बंद राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने डीजे बंदीचा निर्णय दिला असून राज्य सरकारनेही याबाबत वेळोवेळी परिपत्रक काढले आहेत. परंतू, ‘डीजे’मुक्त यवतमाळ जिल्हा करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. डीजेच्या अतिरेकाला आळा घालून पारंपरिक पद्धतीने व शांततेत सण उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचा निर्णय येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्री संजय राठोड यांना डीजेमुळे त्रास
या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वत:चा अनुभव कथन करुन डीजेचे दुष्परिणाम सांगितले. ते म्हणाले, नेर, दारव्हा, दिग्रसच्या रॅलीत डीजेसमोर नाचवल्यामुळे ४-५ दिवस कानाला त्रास झाला, महिनाभर उपचार घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्सव साजरे करताना ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि लहान मुलांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सण उत्सवांचा उत्साह, परंपरा आणि संस्कृती जपत सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवत उत्सव साजरे करावे. तसेच आगामी काळात डीजेच्या अतिरेकाला आळा घालून पारंपरिक, संस्कृतीला साजेशा आणि शांततामय वातावरणात उत्सव साजरे करण्यासाठी प्रशासनासोबत सर्व समाजघटकांनी सामूहिकपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.
पारंपारिक पद्धतीने सण-उत्सव साजरा करावेत
गणेश मंडळांनी गणेशोत्सवात बँड, भजन, कीर्तन महोत्सव, आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, औषध वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उपक्रम राबवा, अशा सूचना प्रशासनाने या बैठकीत उपस्थित सदस्यांना केल्या. डीजे संदर्भात सर्वांनी जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी