
नांदेड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास तुम से ना हो पायेगा!’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील विकासाच्या घोषणांचा आणि प्रत्यक्ष कामांचा हिशोब जनतेसमोर मांडला.
गोदावरी रिव्हरफ्रंट विकास प्रकल्पाची घोषणा झाली असली तरी गोदावरी नदीत सांडपाणी सोडण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. शहरातील भूमिगत मलनिस्सारण योजना तसेच वाढीव पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न सुटलेला नाही. लेंडी सिंचन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधी पोहोचणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विष्णुपुरी आणि ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतील उर्वरित कामे कधी पूर्ण होणार, उणकेश्वर सिंचन प्रकल्पाचे पुढे काय झाले आणि बाभळी प्रकल्पाचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार, असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis