
नंदुरबार, ११ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) प्रभावीपणे राबविण्यात यावा. या योजनेंतर्गत बँकांकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांना विनाकारण विलंब न करता तातडीने मंजुरी द्यावी, असे निर्देश उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हा उद्योग विभागाची आढावा बैठक रंगावली सभागृहात पार पडली. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन पी., अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, नाशिक विभाग उद्योग सहआयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) निलेश गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत बँकांकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची तातडीने छाननी करून पात्र प्रकरणांना कर्जमंजुरी द्यावी.
बँकांकडून नाकारण्यात आलेल्या प्रकरणांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळे येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दरमहा आढावा घेण्यात यावा. तसेच बँकांकडे प्रलंबित असलेली कर्जप्रकरणे येत्या ६० दिवसांत मंजूर करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ. सामंत यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील उद्योगविषयक विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. युवकांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर