
नंदुरबार, 11 सप्टेंबर (हिं.स.) नंदुरबार जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 123 उद्योजकांनी केले 5हजार 3 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून 7 हजार 778 हजार रोजगार निर्मिती होणार असून जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. स्थानिकांना रोजगार मिळाल्यास उद्योग आणि स्थानिक
नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होऊन उद्योगांचा विकास सुरळीतपणे होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
नंदुरबार येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन जिल्हा नियेाजन सभागृहात संपन्न झाले.
यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.सामंत बोलत होते. या परिषदेस आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग
विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय
गोगटे, नाशिक विभाग उद्योग सह आयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व
सेवा) निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात स्थानिक
उद्योजकांचा मोठा वाटा आहे. मोठ्या उद्योगांना राज्यात ज्या पद्धतीने रेड कार्पेट देऊन गुंतवणुकीसाठी
प्रोत्साहन दिले जाते, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांनाही सन्मान व प्रोत्साहन मिळाले
पाहिजे. याच उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. मागील
वर्षी झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा दर सुमारे 63 टक्के असून, ही बाब महाराष्ट्रातील
उद्योग क्षेत्रासाठी समाधानकारक आहे.
जमीन अधिग्रहणाच्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, त्यांना योग्य मोबदला देणे तसेच उद्योग सुरू
झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्यास उद्योग परिसरात गैरसमज व असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उद्योग आणि स्थानिक नागरिक यांच्यात
विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमेलगत असल्याने वस्त्रोद्योगासह विविध उद्योगांसाठी येथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. गुजरातमधील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी नंदुरबारमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे
यावे. आवश्यक सुविधा, प्रोत्साहनपर सवलती व शासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यातील विविध उद्योगांसाठी सुमारे 5003.68 कोटी रुपयांच्या 123
उद्योजकासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग क्षेत्रात 2
हजार कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पाचा सामंजस्य करारही करण्यात आले आहे. हे प्रकल्प निर्धारित
कालावधीपेक्षा कमी कालावधीत प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत. लवकर प्रकल्प
उभारणाऱ्या उद्योजकांना शासनाकडून अधिक प्रोत्साहन देण्यात येईल.तसेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग
विभागाकडून उद्योजकांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. उद्योगांनी शासनाला सहकार्य
करावे आणि विद्यमान उद्योजकांनी इतर उद्योजकांनाही नंदुरबारमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करावे.
शासन आणि उद्योजकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास नंदुरबार जिल्ह्याचा औद्योगिक विकास अधिक
वेगाने होईल, असा विश्वास उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्याला गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या
सीमेलगत असलेले भौगोलिक स्थान, सुरतसारख्या जागतिक बाजारपेठेची असलेली जवळीक, रेल्वे व रस्ते
संपर्क, मुबलक नैसर्गिक संसाधने, कृषी उत्पादन तसेच शिस्तबद्ध व मुबलक मनुष्यबळ यामुळे औद्योगिक
विकासाच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या
या सर्व संधींचा प्रभावीपणे उपयोग करण्याची गरज आहे. नंदुरबार जिल्ह्याला राष्ट्रीय व राज्यस्तरीय
वाहतूक मार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे नंदुरबारला मोठा औद्योगिक फायदा मिळू शकतो. नंदुरबार हा
कृषीप्रधान जिल्हा असून, टेक्सटाईल, केमिकल,मिरची उद्योग आणि अन्य कृषी उत्पादनांवर आधारित
प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग युनिट्स, विशेष प्रक्रिया केंद्रे तसेच साठवणूक व वेअरहाउसिंग सुविधांना मोठा
वाव असल्याचे सांगितले.
राज्यात उद्योगांना विविध शासकीय विभागांच्या परवानग्या व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून
देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मैत्री’ उपक्रमातंर्गत उद्योगांना आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय
प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि उद्योजकांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी या प्रणालीची
भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मित्ताली सेठी म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक विकासाला मोठी क्षमता असून,
पुढील दहा वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक आणि उद्योगवाढीस चालना देण्याची
मोठी संधी जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे. उद्योजकांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडाव्यात.
स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, राज्यस्तरीय प्रश्नांच्या
निराकरणासाठी उद्योग विभागाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या
विकासासाठी प्रशासनाने गेल्या वर्षभरात पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. मागील वर्षी भांडेर
एमआयडीसी परिसरात वीज व पाण्याची उपलब्धता तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊ.
उद्योजकांनी कोणत्याही अडचणीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा. प्रशासनातील संपूर्ण यंत्रणा उद्योगांच्या
पाठीशी असून, छोट्या-मोठ्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आपण सदैव उपलब्ध आहोत, असे जिल्हाधिकारी
डॉ. सेठी यांनी सांगितले.
यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.सामंत यांनी जिल्ह्यातील औद्योगिक संघटना व उद्योजकासमवेत
मुक्तपणे संवाद साधुन त्यांच्या अडअडचणी जाणून घेवून तातडीने दखल घेऊन विविध विभागाच्या
प्रमुखांना दूरध्वनीवरुन संवाद साधुन त्यांच्या अडचणी त्वरीत सोडविण्याचे निर्देश दिले.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील उद्योगाच्या अडअडचणी बाबत माहिती दिली. या परिषदेस
मोठया संख्येन उद्योजक, गुंतवणूकदार,निर्यातदार शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर