
नंदुरबारमध्ये बोलीभाषा संवर्धनासाठी विशेष उपक्रम लेखकांचे साहित्य शासन खरेदी करणार
नंदुरबार, ११ सप्टेंबर (हिं.स.) : मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.
नंदुरबार येथील बिरसा मुंडा सभागृहात साहित्यिकांसमवेत संवाद व आढावा बैठक झाली. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन पी., मराठी भाषा विभागाचे भाषा संचालक डॉ. अरुण गिते, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणाऱ्या मराठी भाषा कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत प्रकाशित पुस्तके, ग्रंथ आणि विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. या कार्यालयाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वाचन संस्कृतीला चालना मिळण्यास मदत होईल.
मराठी भाषेच्या प्रमाणभाषेबरोबरच विविध बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषा, अहिराणी तसेच स्थानिक बोलीभाषांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन साहित्य संमेलने, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध भाषिक उपक्रम आयोजित करता येतील.---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर