नाविन्यपूर्ण प्रशासकीय उपक्रमांसाठी ओमकार पवार यांना एस. एस. गडकरी पुरस्कार
नाशिक, ११ सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्क
Omkar Pawar, Chief Executive


नाशिक, ११ सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना जाहीर झाला आहे.

पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘नवचेतना अभियान’ आणि ‘पोषणदूत’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजातील सर्वात दुर्बल घटकांची ओळख करून त्यांच्यापर्यंत विद्यमान शासकीय योजना व सेवांचा प्रभावी समन्वय साधत प्रत्यक्ष परिणाम घडवून आणणे, हे या उपक्रमांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.नवीन योजना निर्माण करण्याऐवजी उपलब्ध शासकीय यंत्रणा, निधी आणि योजनांचा एकत्रित वापर करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमांची आखणी करण्यात आली.

‘नवचेतना अभियानातून’ १ लाख ६ हजार महिलांचे मॅपिंग

‘नवचेतना अभियान’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या माध्यमातून १ लाख ६ हजार महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत आणि मॅप करण्यात आली. संबंधित महिलांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी जोडण्यात आले.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य व्याजदराने एकूण १ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे आयोजित करण्यात आले. या माध्यमातून सात पुनर्विवाहही संपन्न झाले.विधवांच्या सन्मानासाठी राबविण्यात आलेल्या ‘सौभाग्य शपथपत्र’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबतच्या असामाजिक प्रथा बंद करण्याबाबत ठराव केले.

शिक्षण आणि बालसंगोपनावरही भर

शिक्षण क्षेत्रात ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच ३२२ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून १५ हजार ६ बालकांना दरमहा २ हजार २५० रुपयांचे सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. कुपोषणाविरुद्ध राबविण्यात आलेला ‘पोषणदूत’ हा उपक्रम ‘One Officer, One Child, One Promise, Zero Rupees’ या संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक कुपोषित बालकाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित करून त्याच्या वजनाची नोंद, औषधोपचार, लसीकरण, आहार तसेच कुटुंबाच्या अडचणींचा नियमित पाठपुरावा करण्यात आला.या उपक्रमांतर्गत १ हजार ९५४ कुपोषित बालकांचे ट्रॅकिंग करण्यात आले. त्यापैकी ९८४ बालके सामान्य स्थितीत पोहोचली, तर ६११ बालके तीव्र कुपोषणाच्या स्थितीतून बाहेर आली. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक उत्तरदायित्वातून बालकांचा नियमित पाठपुरावा करण्यात आला.

तब्बल ६४३ गावांमध्ये अभ्यासिकांची उभारणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ६४३ गावपातळीवरील अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. कमी अर्थसंकल्पीय हस्तक्षेपातून अधिकाधिक परिणाम साधण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.महिला सक्षमीकरण, बालपोषण आणि शिक्षण या क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये सर्वेक्षण, लक्ष्यित लाभ, वैयक्तिक उत्तरदायित्व, विभागीय समन्वय आणि नियमित पाठपुरावा यांचा प्रभावी वापर करण्यात आला. या नाविन्यपूर्ण प्रशासकीय दृष्टिकोनाची दखल घेत ओमकार पवार यांची एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण

२१ सप्टेंबरलाया पुरस्काराचे वितरण सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.१० वाजता मंत्रालय अॅनेक्स, मुंबई येथील परिषद सभागृहात होणार आहे. आयआयपीए महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव स्वाधीन एस. क्षत्रिय, भा.प्र.से. (निवृत्त) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande