
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। श्रीगणेश आगमन आणि अनंत चतुर्दशीचा उत्सव जिल्ह्यात शांततापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडावा तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी,यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या १४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश आगमन अर्थात श्रीगणेश मूर्ती स्थापना उत्सव साजरा होणार आहे.हा उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये १४ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी अर्थात श्रीगणेश विसर्जन होणार आहे.या पार्श्वभूमीवर अनुज्ञप्ती परवान्याच्या अटी व शर्तींनुसार त्या दिवशीही धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता कायम राहावी,यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमांतील तरतुदीनुसार संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis