
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाच समाजाच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा विधायक संदेश देणारे ‘श्री. गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ हे अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणार आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून,जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांनी या उपक्रमांतर्गत नियोजनबद्ध आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे,असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धाराशिव यांनी केले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचे प्रभावी माध्यम ठरावे,या उद्देशाने आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर या अभियानात भर देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या समाजशक्तीला आरोग्य संवर्धनाची जोड मिळाल्यास गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचण्यास मदत होणार आहे.
‘श्री. गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित करणाऱ्या नोंदणीकृत गणेश मंडळांना जिल्ह्यातील सेवाभावी संस्था,सार्वजनिक धर्मादाय संस्था तसेच धर्मादाय रुग्णालयांनी आवश्यक ते सहकार्य करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.विविध संस्थांच्या समन्वयातून आरोग्य शिबिरांचे प्रभावी आणि नियोजनबद्ध आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या समन्वयासाठी गणेश मंडळांनी कार्यालय अधीक्षक व निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांनी पुढाकार घेत नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य शिबिरे आयोजित करावीत,असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis