पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. य
PCMC


पुणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या आदेशानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधित कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी बांधकाम विभागातील सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधित अधिकारी अनेक वर्षांपासून बांधकाम परवानगी विभागात कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप हिंगे यांनी केला आहे. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दाखल होणाऱ्या नस्तीमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी, उणिवा आणि त्रुटी काढल्या जातात. त्यामुळे मंजुरीच्या प्रक्रियेला विलंब होतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.विकास प्रकल्पांमधील जागांचा मूळ नकाशा किंवा रस्ता बदलणे, मंजूर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे, तसेच कागदपत्रांमध्ये अनावश्यक कायदेशीर अडथळे निर्माण करून नागरिकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत महापालिका आयुक्तांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या प्रकणातील पुढील चौकशीत आरोपांची सत्यता तपासली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande