
यवतमाळ, 11 सप्टेंबर (हिं.स.) सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये राज्यात यवतमाळ जिल्हा पोलिस प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात डीजे बंद करण्यासंदर्भात आदेश काढणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले.
आगामी सण उत्सवासंदर्भात पोलिस ठाण्यातर्फे स्थानिक छत्रपती संभाजी राजे उद्यानाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार किसन वानखेडे होते. आगामी गणेशोत्सवामध्ये डीजेच्या संदर्भात गणेशभक्तांच्या मनात असलेल्या संभ्रमावस्थेमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होेते. या बैठकीला संपूर्ण सभागृह गणेश मंडळाच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती. मंडळाच्या सदस्यांनी सभागृह खचाखच भरले होते. परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी डीजेला परवानगी मिळणार नाही, असे सुतोवाच केल्याने गणेश मंडळातील सदस्यांचा भ्रमनिराश झाला. या बैठकीला अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात, माजी आमदार उत्तम इंगळे, नगराध्यक्ष तेजश्री जैन, भाजप समन्वयक नितीन भुतडा, शिवसेना नेते साहेबराव कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव कायंदे पाटील, ठाणेदार शंकर पांचाळ व उमरखेड, महागाव तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते. यावेळी बोलताना कुमार चिंता यांनी पंधरा वर्षांपूर्र्वी डीजे संस्कृती नसताना उत्सव साजरे होत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित करीत डीजेसाठी लढाई करण्यापेक्षा भक्तीभावाने उत्सव साजरा करा, कायदा सर्वांसाठी सारखा असून एक गणपती मंडळ, एक अंमलदार ही संकल्पना गणेशोत्सवात राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी युवकांचे स्किल वाढवण्यापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याकडेच असून अध्यात्माची बैठक असणारा तसेच राज्यघटना देणारा महाराष्ट्र असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अशांती फैलावणारे दुष्कृत्य करण्यापेक्षा चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सुरक्षिततेला प्राधान्य देऊन उत्सव साजरे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी ठाणेदार शंकर पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव कायंदे यांनी आगामी सण-उत्सवासंदर्भात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. यावेळी आमदार किसन वानखेडे यांच्यासह साहेबराव कांबळे, तेजश्री जैन, उत्तम इंगळे, नितीन भुतडा, अॅड. संजय जाधव, अॅड. शिवाजी वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल गुंडे यांनी तर आभार सहाय्यक पोलिस निरिक्षक विनायक राठोड यांनी मानले.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी