
रायगड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी माणगाव आणि इंदापूर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ लागू केला आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून गणेशभक्त मोठ्या संख्येने कोकणात रवाना होतात. त्यातच ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान एसटी बसेस तसेच खासगी वाहनांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही उपाययोजना केली आहे.
माणगाव आणि इंदापूर बाजारपेठा महामार्गालगत असल्याने गर्दीच्या काळात रस्त्याच्या कडेला होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी संबंधित मार्गांवर दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग’ लागू केले आहे.
माणगावमध्ये रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड आणि मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल या मार्गांचा समावेश आहे. तर इंदापूरमध्ये माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गावर दोन्ही बाजूंना ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे.
ही अधिसूचना ११ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच अधिकृत पासधारक वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
गणेशभक्त आणि वाहनचालकांनी महामार्गावर अनधिकृतपणे वाहने पार्क न करता वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)